अलिबाग शहरात तणाव; पोलिसांनी बोलावली बैठक

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील एका खासगी शिकवणीमधील वादाचे निमित्त होऊन रविवारी (दि.30) शहरात काही काळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणाबाबत पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले असून सोमवारी (दि.31) पोलीस अधीक्षक मुख्यालयात बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चार दिवसांपूर्वी अलिबाग शहरातील एका खासगी शिकवणीमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये मुलांनी थोर पुरुषांबद्दल अपशब्द वापरले. परिणामी दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध संघटनांचे युवक मोठ्या संख्येने रात्री उशिरा जमले.

थोर पुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने तसेच एका गटातील मुलाला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या युवकांनी अलिबाग शहरातून बाईक रॅली काढली. विविध घोषणा दिल्यात्यानंतर अलिबाग येथील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने युवक जमा झाले होते. ज्यांनी अपशब्द वापरले, त्यांना या ठिकाणी बोलवा आणि माफी मागायला लावा, अशी मागणी युवकांनी लावून धरली होती.

यामध्ये पोलीस तसेच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी गर्दी कमी करण्याची सूचना केली; परंतु गर्दी वाढतच होती. अखेर पोलिसांनी थोडी आक्रमक भूमिका घेत जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या दालनात एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर या प्रकारात काय भूमिका घ्यायची हे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version