भारत-पाक लढतीचा तणाव सर्वांनाच!

खरं तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे अन्य क्रिकेट सामन्याप्रमाणेच असलेला. मात्र, या दोन संघांतील क्रिकेट लढतीलाच अवास्तव आणि अवाजवी महत्त्व का दिलं जातं? खरं तर, या दोन क्रिकेट संघांतील तणावपर्णू क्रिकेट सामने असतात, त्याच कालावधीत स्क्वॉश, हॉकी यासारखे सामनेदेखील होत असतात. मात्र, त्या सामन्यांना अशी प्रसिद्धीदेखील मिळत नाही किंवा कुणी फारशी दखलदेखील घेत नाही. मग क्रिकेटमध्ये असं काय आहे, ज्याची जाहिरातबाजी अधिक करण्यात येते. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण राजकीय वातावरणातदेखील काही खेळ आणि कार्यक्रम उरकले जातात. ज्याबद्दल फारशी वाच्यताही होत नाही. मग क्रिकेटमध्येच असं काय लपलं आहे, ज्याकडे सर्वांचे अधिक लक्ष जाते. फाळणीनंतर क्रिकेट विभक्त झाले. काही काळाकरिता त्या क्रिकेटपटूंनी एकमेकांविरुद्ध मालिकाही खेळली. एकेकाळचे साथीदार प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परंतु, त्यावेळीही सध्याप्रमाणे वैराची वातावरणरनिर्मिती केली गेली नव्हती. याचाच अर्थ, मैदानावरच्या या संघर्षाचे व्यापारीकरण केलं जात आहे.

टेलिव्हिजन वाहिन्यांवरील जाहिरात पाहिल्या की, वाटतं हा एक क्रिकेट सामना आहे की युद्ध! युद्ध असल्याप्रमाणे आपल्या येथे वातावरणनिर्मिती केली जाते. क्रिकेटवेड्या भारतीयांचा त्यामध्ये बळी जातो. जया-परजयाचे पडसाद समाजमाध्यम आणि समाजात उमटायला लागतात. काही वेळा तर दंगलीही होतात. असं काय आहे भारत-क्रिकेट संघर्षात? पाकिस्तानातही यापेक्षा वेगळे वातावरण नसते. पराभूत होणाऱ्या संघाला संपूर्ण समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. क्रिकेट लढतीच्या या रोषामध्ये दोन्ही देशांच्या संघाचे क्रिकेटपटू होरपळत जातात. सध्या सात सलग विजय मिळविणारा भारतीय संघ सुपात आहे आणि सलग सात विश्वचषक सामन्यात पराभूत होणारा पाकिस्तानचा संघा जात्यात आहे. मात्र, क्रिकेटबाबतीत असं का व्हावं! याचे मुख्य कारण म्हणजे, दोन्ही देशात क्रिकेट हा खेळ धर्मासारखा मानला जातो. एरव्ही सद्गृहस्थाप्रमाणे वर्तन करणारा सुशिक्षित क्रिकेटप्रेमीही भारत-पाक क्रिकेट सामन्याच्या वेळी बावचळला जातो. तो सारासार विचार करण्याचे सोडून देतो आणि एका सामन्याच्या निकालावरच आपलं आणि देशाचं भवितव्य असल्यासारखे वागायला लागतो. विजयाने त्याला अत्यानंद होतो. आता काहीही नको, असं म्हणत तो उर्वरित सामने पाहतो. आणि, याआधीच्या सात लढतीत भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तान संघांची वाटचाल मात्र अनेकदा आपल्या पुढची असते. अपवाद फक्त 2003 आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धेचा. त्यावेळी एकदा आपण उपविजेते, तर दुसऱ्यांदा विजेते ठरलो होतो. म्हणजे, भारताकडून पराभूत झाल्यावर पाकिस्तानचा संघ अधिक त्वेषाने, उसळून उठतो. त्याची कामगिरी अधिक उंचावत जाते. भारत-पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला अनुभवलेले वातावरण वेगळ्याच विश्वातील असते. त्याला वादळापूर्वीची शांतता म्हणावये का? आणि त्याक्षणी दोन्ही देशांचे क्रिकेटपटूदेखील प्रचंड तणावाखाली वावरत असतात.

1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळच्या सामन्याचा एक प्रसंग:- मँचेस्टरला आदल्या दिवशी आम्ही पत्रकार मंडळी एका भारतीय रेस्टाँरंटमध्ये जेवण करत होतो. तेथे सौरव गांगुलीही आला होता. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता; परंतु बोलतानाही तो दबल्यासारखा वाटत होता. तो दुखापतग्रस्तही होता. उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबतही साशंक होता. म्हणजे, तणाव फक्त प्रेक्षकांवरच येत नाही. प्रचंड तणावाच्या वातावरणात खेळाडूही वावरत असतात.

niharika.dalvi@krimsoncerise.com

Exit mobile version