दहावी नापास विद्यार्थ्यांना कोडाईकनालच्या हॉटेलमध्ये कुटुंबासह मोफत राहण्याची संधी

तामिळ नाडू | वृत्तसंस्था |

बहुसंख्य राज्यांनी दहावीचे निकाल जाहीर केले आहेत. कोरोनामुळे परीक्षेच्या पद्धतीत तसेच गुणदानाच्या पद्धतीत बदल करण्यात आले होते. असं असलं तरी दहावीचा निकाल 100 टक्के लागला नसून जवळपास सगळ्या राज्यांत काही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत नापास झाले आहेत. या नापास मुलांचे मनोबल उंचावण्यास मदत व्हावी म्हणून केरळमधील एका उद्योजकाने एक उपक्रम सुरू केला आहे. 10वीत नापास विद्यार्थ्यांना कोडाईकनाल इथल्या हॉटेलमध्ये मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुधीश असं या उद्योजकाचं नाव असून त्याने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये या उपक्रमाची माहिती दिली आहे.

सुधीश यांच्या मालकीची कोडाईकनाल इथे द हॅमॉक होमस्टे आणि इतर काही हॉटेलं आहेत. तमिळनाडूमधल्या या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी ही हॉटेलं असून इते दहावीचे विद्यार्थी त्यांच्या पालकांसह येऊन राहू शकतात असं सुधीश यांनी म्हटलंय. जास्ती जास्त 2 दिवस हे विद्यार्थी या हॉटेलमध्ये मोफत राहू शकतात. या विद्यार्थ्यांना त्यांची मार्कशीट सोबत बाळगावी लागेल, ज्यामुळे तो विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही हे कळू शकेल. सुधीश यांनी म्हटलंय की ‘दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जल्लोष सर्वत्र दाखवला जातो. मात्र या निकालाची दुसरी बाजू दाखवली जात नाही. विद्यार्थ्यांमधील एक वर्ग असतो ज्या नापास झाल्याने हिणवण्यात येतं.’

सुधीश हे कोझिकोड इथल्या वडाकारा भागाचे रहिवासी आहेत. मात्र 2006 पासून ते त्यांच्या कुटुंबासह कोडाकनाल इथे वास्तव्याला आले आहेत. दहावीत नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जे टोमणे सहन करावे लागतात त्यामुळे ते हताश होत असतात. कोडाईकनालच्या निसर्गसुंदर परिसरात जी शांतता आहे ती अनुभवल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक परिमाण घडू शकतो आणि ते तणावातून बाहेर येऊ शकतात असं सुधीश यांचं म्हणणं आहे. मोफत निवासाची ही सुविधा फक्त तमिळनाडूमधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे का इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये.

नववीतील गुणांचा फटका, 758 विद्यार्थी नापास
महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन शाळांकडून शिक्षण मंडळाला मिळाले. त्यांपैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी दहावी पास झाले आहेत. तर उर्वरित 758 विद्यार्थ्यांना नापास म्हणायचे की या विद्यार्थ्यांच्या निकालाचे शिक्षण मंडळ काय करणार, याविषयी संभ्रमावस्था आहे.

उत्तीर्णतेच्या कक्षेत न आलेल्या या 758 विद्यार्थ्यांच्या निकालाविषयी माहिती देताना शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना नववीतील गुणांचा फटका बसल्याने ते दहावीत नापास झाल्याची शक्यता शिक्षण मंडळाकडून वर्तविण्यात येत आहे. हे विद्यार्थी नववीत नापास झाले किंवा काठावर पास झाले आहेत. तरीही त्यांना दहावीत प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या निकालावर नववीच्या निकालाचा परिणाम झाला. त्यांचे नववीतील गुण अत्यंत कमी असल्याने त्यांना मंडळाने उत्तीर्ण करण्याच्या यादीतून वगळले असून या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यावर स्वतंत्ररीत्या कार्यवाही केली जाणार असल्याचे शिक्षण मंडळातून सांगण्यात आले. त्याचबरोबर परीक्षेसाठी नोंदणी केली पण अंतर्गत मूल्यमापन पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 54 इतकी आहे. परीक्षेसाठी नोंदणी केल्यानंतर यातील काही विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटला, तर काही विद्यार्थी स्थलांतरित झाले अशी शक्यता शिक्षण मंडळाकडून वर्तविण्यात आली आहे.

Exit mobile version