भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

| जम्मू काश्मिर | वृत्तसंस्था |
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. जम्मूहून किश्तवाडला जाणारी बस दरीत कोसळून 30 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरीत कोसळलेल्या बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बचाव मोहीम हाती घेतली आहे. या बसमधून 55 जण प्रवास करत होते. जम्मूवरून किश्तवाडला जात असताना बस डोडाजवळ पोहोचली. या भागात खूप उंचावर आणि वळणावळणाचे रस्ते आहेत. त्याचदरम्यान बस दरीत कोसळली.

दरम्यान, काही जखमी प्रवाशांना डोडा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात तर काहींना किश्तवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे झालेला अपघात दुर्दैवी आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, प्रियजन या अपघातात गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील.

Exit mobile version