सुमारे 12 जण जखमी; अनेक वाहनांची मोडतोड
। लुधियाना । वृत्तसंस्था ।
पंजाबमध्ये लुधियाणामधील अमृतसह-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर खन्ना येथे 100 वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघाताचं कारण धुके असल्याचं बोललं जात आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. अनेक वाहनांची मोडतोड झाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही रुग्ण गंभीर असून त्यांना इतर रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. या अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या वाहनामध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे.
यावेळी, मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्याही निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातात जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.