। नागोठणे । प्रतिनिधी ।
मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे जाणा-या स्कॉर्पिओ गाडीने महामार्गालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन यात एकाचा मृत्यू झाला आहे तर टेम्पो चालकासह स्कॉर्पिओ मधून प्रवास करणा-या तिघांसह चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर म्हणून स्कॉर्पिओ गाडी मधून प्रवास करणारे चार लहान मुले बालंबल बचावले आहेत. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर निडी गावाच्या हद्दीत निडी पुलाजवळ गुरूवारी (दि.१९) दुपारी अडीचच्या सुमारास घडला.
या अपघाता संदर्भात नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावाच्या हद्दीत निडी पुलाजवळ मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे जाणा-या स्कॉर्पिओ चालाक यग्नेश दिलीपभाई पटेल (वय ३३ वर्षे) रा. अहमदाबाद, गुजरात याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या व गणपतींच्या मुर्तीनी भरलेल्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. यामध्ये स्कॉर्पिओचा पुढील भाग चेपला जाऊन प्रवाशी गाडीमध्ये अडकले. यावेळी स्कॉर्पिओ चालकासह स्कॉर्पिओ मध्ये अडकलेले प्रवासी कार्तिक पंकजभाई पटेल (वय २८वर्षे), मानसी कार्तिक पटेल (वय २८वर्षे), फोरम यग्नेश पटेल ( वय ३४ वर्षे) सर्व रा. अहमदाबाद, गुजरात यांना स्थानिकांनी गाडीतून बाहेर काढले. या अपघातात स्काॅर्पिओ मधील प्रवाशांना लहान – मोठ्या स्वरूपाच्या जखमा झाल्या. तसेच अपघाताच्या वेळी टेम्पो तपासणी करण्याकरिता खाली उतरलेला टेम्पो चालक राकेश लक्ष्मण पाटील रा. ईरवाडी, पेण हा गंभीररीत्या जखमी झाल्याने या सर्व जखमींना नागोठणे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने प्रथमोपचारासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. याठिकाणी सर्व जखमींवर उपचार करून या सर्व जखमींना पुढील उपचारासाठी पेण व पनवेल येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
तर या अपघातात स्कॉर्पिओ मधील जित यग्नेश पटेल (वय ०१ वर्ष), धेय यग्नेश पटेल (वय ०४ वर्ष), शिवाय कार्तिक पटेल (वय ५ वर्ष) व न्यासा कार्तिक पटेल (वय ४ वर्ष) हे या अपघातात किरकोळ जखमी झाले असून त्यांनाही पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान स्कॉर्पिओ मधील जखमी प्रवासी कार्तिक पंकजभाई पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे नागोठणे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस अधिक तपास करीत आहेत.