| माणगाव | प्रतिनिधी |
भरधाव कारची मालवाहतूक ट्रकला पाठिमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लाखपाले गावाजवळ घडली. डॉ.पल्लवी पळशीकर (35) रा. लातूर असे अपघातातील मृत वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचे नाव असून, तर डॉ. विशाल रमेश बडे (30), रा. अनपटवाडी पारगाव जि.बीड हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर प्रियांका आहेर आणि डॉक्टर विशाल बडे हे मुंबई – गोवा हायवेवरून पुण्याला निघाले होते. त्यांच्या वॅगनआर कारने कंटेनरला मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग कंटेनरच्या खाली घुसला होता. यात डॉक्टर प्रियांका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या विशाल बडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. विशाल बडे हे गाडी चालवत होते. कंटेनर चालक महाडहून- मुंबईच्या दिशेने जात होता. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथं मोठा चढ आहे आणि या ठिकाणी कंटेनर चालक एका लेनवरून दुसऱ्या लेनमध्ये गाडी चालवत होता. माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजै लाखपाले इथं पेट्रोल पंपासमोर कारने कंटेनरला मागून धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने गाडीतून प्रियांका आणि विशाल यांना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रियांका यांचा जागीच मृत्यू झाला होता. विशाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.







