टँकरमधून रसायन गळती
| डहाणू | प्रतिनिधी |
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे उड्डाणपुलावर सोमवारी (दि. 30) दुपारी 1 वाजताच्या सुमारास रसायन वाहतूक करणार्या टँकरने सिमेंट पाईप घेऊन जाणार्या ट्रेलरला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. अपघातात टँकर फुटून मोठ्या प्रमाणत रसायनाची गळती झाली असून चालक टँकरमध्ये अडकला आहे. तर सिमेंट पाईप वाहून नेणार्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातामुळे महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. दरम्यान स्थानिकांनी टँकरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रसायन गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रसायन ज्वलनशील नसल्याची खात्री पटल्यानंतर नागरिकांनी वाहनजवळ जाऊन मदतकार्य सुरू केले आहे.







