। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड राजवाड्याच्या उतारावर घरी परत येत असताना बुधवारी (दि.26) मध्यरात्री 12:30 च्या सुमारास मुरूडमधील इर्टिका कारला अपघात झाला. ती गाडी 15 ते 20 फूट खाली पडली. यामध्ये तिघेजण जखमी झाले.
डांगे यांच्या कुटुंबातील मुलीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला होता. दुसर्या दिवशी मुलीच्या सासरी सत्यनारायणाची पूजा होती. त्या निमित्ताने डांगे कुटुंब मुलीच्या सासरी पुजेसाठी गेले होते. तेथून रात्री परत येत असताना राजवाडा सोडल्यावर उतारावर अचानक गाडीचा वेग वाढल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
त्यामुळे गाडी समुद्राच्याबाजुला असलेल्या संरक्षक कठड्यावरुन पलटी मारत खाली कोसळली. गाडीतून सहाजण प्रवास करीत होते. त्यापैकी तिघे जखमी झाले. त्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला काही तपासण्या करण्याकरीता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.