| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव-नाईक आळी येथे टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि.19) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वीस वर्षीय मोटारसायकलस्वार तरुणाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृत तरुण नागाव-खारगल्ली येथील रहिवासी असून, तो आपल्या भावाला अलिबाग येथे सोडून घरी परतत होता. दरम्यान, अपघातग्रस्त टेम्पो चौल-भाटगल्ली येथील आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघाताची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.