रायगड पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान
| खोपोली | प्रतिनिधी |
पुण्यानंतर आता रायगडातही कोयता गँगने धुडगूस घातला असून, जिल्ह्यातील खोपोली, कर्जत तालुक्यातील अनेक घरांमध्ये घरफोडी करीत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. या चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्या असून, चोरट्यांच्या हातात कोयत्यासारखे घातक शस्त्र असल्याचे दिसून येत आहे. कोयता नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत आहे. या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
खोपोलीत बंद फ्लॅट फोडले
खोपोली शहरात सध्या बंद असलेल्या फ्लॅटला चोरट्याने लक्ष केले असून, वरच्या खोपोलीत ओमकार अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी चार ते पाच बंद फ्लॅट फोडून दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला आहे.
गुरुवार (दि.2) मध्यरात्री सुमारास चोरट्यांच्या टोळीने वरच्या खोपोलीतील ओमकार अपार्टमेंटमध्ये घुसून बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कडी कोयंडे कोणत्या तरी हत्याराने उपकून त्यावाटे आत प्रवेश केला. यावेळी सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसू नये म्हणून चोरट्याने हातातील कोयत्याच्या सहाय्याने सीसीटीव्ही कॅमेर्याची दिशा बदलली. बिल्डिंगमधील प्राजक्ता गायकवाड, रमाकांत तेलंगे यांच्यासह इतर फ्लॅटमधील कपाटात ठेवलेले 1 लाख 26 हजार किमतीचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 36 हजार रुपये किमतीचा माल घरफोडी करून चोरी केला आहे.
याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोसई अभिजीत व्हरांबळे हे करीत आहेत.
खोपोली पोलिसांकडून विविध सोसायट्यांच्या पदाधिकार्यांची बैठक बोलावून सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांसोबत नागरी पहारा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. संयशित हालचाली निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
शिरीष पवार, पोलीस निरीक्षक, खोपोली