। पनवेल । प्रतिनिधी ।
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मंगळवारी (दि.22) रोजी हल्ला केल्याची घटना घडली आहे. पनवेल येथील सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील हे काल 40 जणांच्या ग्रुप सहित या हल्ल्यात सापडले होते. त्यातील एका पर्यटकाला उर्दू भाषेतील पुस्तक वाचायला न आल्याने दहशतवाद्यांनी ठार मारले होते. तर एका चहा टपरीत लपलेले असताना सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेली होती.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना इंडियन आर्मी 92 बेस हॉस्पिटल पेहलगाम येथे भरती करण्यात आले आहे. यावेळी पनवेलच्या सुबोध पाटील यांनी घडलेला सगळा थरार सांगितला. एका चहाच्या टपरीत लपलो असताना मानेला गोळी चाटून गेल्याची माहिती सुबोध पाटील यांनी दिली आहे. अंगावर काटा आणणारा त्यांचा हा अनुभव होता.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमधील नागरिक व पुणे येथील पर्यटक धनंजय जाधव आणि पुजा धनंजय जाधव यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोर्चा काढत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पर्टकांसाठी हा परिसर बंद करण्यात आला असून तपास यंत्रणेला अडचण होऊ नये या अनुशंगाने पेहलगामपूर्वीच जम्मू काश्मिरचे पोलीस वाहने अडवत असून पुढे गाड्या पाठवत नसून या गाड्या पून्हा श्रीनगरच्या दिशेने पाठवत आहेत.