| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे होणार असून, येथील खेळपट्टी किमान पहिल्या डावात तरी फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे. आतापर्यंत येथे दोन कसोटी सामने झाले असून 2019 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 502 धावांचा डोंगर उभा केला होता. मयांक अगरवालने दुहेरी शतक, तर रोहितने 176 धावांची खेळी केली होती. त्यामुळे जडेजाच्या जागी संघ व्यवस्थापन निश्चितपणे अष्टपैलू किंवा निव्वळ फलंदाजाचा विचार करू शकेल.
गोंधळलेल्या अवस्थेत संघ व्यवस्थापन इंग्लंडचे फलंदाज ज्या पद्धतीने पहिल्या कसोटीत खेळले ते बघता भारतात येताना ते ठोस अशा योजना घेऊन आले आहेत. यात त्यांनी पहिल्या कसोटीत तरी काही बदल केले नाहीत. स्वीप फटक्याचा मुक्त वापर करून त्यांनी भारतीय फिरकी गोलंदाजीवर दडपण आणले. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने आत्मपरीक्षण करून फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज असल्याचाच धडा पहिल्या कसोटी सामन्याच्या निकालाने दिला आहे.
अंतिम अकरा खेळाडूंमध्ये बदल करायचा झालाच तर, संघ व्यवस्थापन चार फिरकी गोलंदाजांसह खेळू शकते. यासाठी मोहम्मद सिराजला वगळून कुलदीपला संधी दिली जाऊ शकते. त्याचवेळी सर्फराज खान किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाचा विचार करू शकते. जडेजाप्रमाणे डावखुरा फिरकी गोलंदाज असणारा सौरभ कुमार फलंदाजीही चांगली करू शकत असल्यामुळे त्याचाही विचार केला जाऊ शकतो. एकूणच संघ व्यवस्थापनाची स्थिती आता तरी गोंधळलेली दिसत आहे.