कसोटी सामन्यात भारतीय महिलांचा दबदबा

पहिल्या डावात 157 धावांची आघाडी

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात दीप्तीसह स्मृती मनधाना (106 चेंडूंत 74), जेमिमा रॉड्रिग्ज (121 चेंडूंत 73) आणि आपला पहिला कसोटी सामना खेळणारी रिचा घोष (104 चेंडूंत 52) या चौघींनी अर्धशतके साकारली. रिचा बाद झाल्यानंतर भारताने 14 धावांत चार फलंदाज गमावल्या. त्यामुळे एकवेळ (3 बाद 260) अशा सुस्थितीत असणाऱ्या भारताचा डाव (7 बाद 274) असा अडचणीत आला होता. त्यावेळी दीप्ती व वस्त्रकार यांनी अप्रतिम फलंदाजी करताना भारताला दीडशतकी आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने आठ गोलंदाजांचा वापर केला, पण केवळ ऑफ-स्पिनर ॲश्ले गार्डनरला (4/100) प्रभाव पाडता आला.

तत्पूर्वी, भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 1 बाद 98 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. स्नेह राणाने 57 चेंडू खेळून काढताना 9 धावा केल्या. मात्र, तिला मनधानासह अर्धशतकी भागीदारी करण्यात यश आले. अखेर गार्डनरने राणाला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. यानंतर मनधाना 74 धावांवर धावचीत झाली. रिचा व जेमिमाने चौथ्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी रचत भारताचा डाव पुढे नेला. रिचा पदार्पणातच अर्धशतक झळकावणारी भारताची 14 वी फलंदाज ठरली. दुसऱ्या बाजूने जेमिमानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर मध्यमगती गोलंदाज किम गार्थने रिचाला गार्डनरकरवी बाद करत ही जोडी फोडली. जेमिमा शतकाच्या दिशेने वाटचाल करत होती, पण गार्डनरने तिला बाद केले. जेमिमाने 121 चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार लगावले. गार्डनरनेच भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (0) आणि यास्तिका भाटिया (1) यांना आपल्या सलग दोन षटकांत माघारी पाठवत भारताला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु दीप्ती आणि वस्त्रकार या अष्टपैलू खेळाडूंनी भारताचे वर्चस्व कायम राखले.

Exit mobile version