शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

जिल्ह्यात 1 लाख 84 हजार 162 विद्यार्थी

| रायगड । प्रतिनिधी ।

समग्र शिक्षा अभियानातंर्गत रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या 1 लाख 84 हजार 162 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 84 हजार 162 विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्‍यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे.

मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येणारे जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत सर्वात जास्त 49 हजार 933 विद्यार्थी पनवेल तालुक्यात असून, अलिबाग 13 हजार 22, पेण 15 हजार 325, उरण 9 हजार 598, कर्जत 20 हजार 357, खालापूर 15 हजार 338, सुधागड 7 हजार 303, रोहा 10 हजार 613, माणगाव 11 हजार 765, महाड 11 हजार 229, पोलादपूर 2 हजार 640, म्हसळा 4 हजार 26, श्रीवर्धन 5 हजार 749, मुरुड 4 हजार 728, तळा 2 हजार 536 विद्यार्थी आहेत.
Exit mobile version