। माथेरान । वार्ताहर ।
समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजने अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी कर्जत गटातील मराठी, उर्दू आणि सेमी इंग्रजी या माध्यमाकरिता रायगड जिल्हा परिषद यांसकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्या पुस्तकांचे वाटप कर्जत तालुक्यातील कन्या शाळेमध्ये येथील विविध शाळांना वाटप करण्यात आले.
इयत्ता पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे. मागील दोन वर्षे कोरोना काळामध्ये शालेय पाठ्यपुस्तके वितरित होऊ शकली नाहीत. मात्र यावेळेस अगदी नियोजनबद्ध पद्धतीने रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. या पुस्तकांचे वितरण कर्जत येथे असलेल्या कन्या शाळेमध्ये गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठ्यपुस्तक समन्वयक मालू गायकवाड, नविद हाश्मी, राम एनकर, सुनील राणे यांच्या हस्ते एकूण 324 शाळा व केंद्रनिहाय पाठ्यपुस्तके केंद्र प्रमुख यांना वाटप करण्यात आले. तसेच समावेशीत शिक्षण अंतर्गत दिव्यांग अथवा अंध असणार्या विद्यार्थ्यांना लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तके पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे समावेशीत शिक्षण विशेष तज्ञ नविद हाश्मी आय.ई.डी.टीमच्या प्रतीक्षा तायडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या पाठ्यपुस्तकांमुळे तालुक्यासह माथेरानच्या 194 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
कर्जत तालुक्यातील समग्र शिक्षण अभियानातंर्गत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद, नगरपरिषद, शासकीय, आश्रम शाळा व खाजगी अनुदानित अशा सर्व मिळून एकूण 324 शाळांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली आहेत.
सुरेखा हिरवे, गटशिक्षणाधिकारी