पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर महापालिकेची कार्यवाही
। नवी मुंबई । वार्ताहर ।
पाणथळ क्षेत्रात बेकायदेशीररीत्या डेब्रिजची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने वाशी सेक्टर 9 येथे एका बांधकाम व्यावसायिकाने टाकलेले डेब्रिज हटविले आहे.
नवी मुंबईत विकास प्रकल्पांच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड प्रस्तावित केली आहे. तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने झाडांची कत्तल सुरूच आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाणथळ क्षेत्रांवर विविध मार्गांनी गंडांतर आणले जात आहे. काही ठिकाणी डेब्रिजचे ढीग टाकून पाणथळ क्षेत्राची व्याप्ती कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेरूळ येथील एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ क्षेत्रात मागील काही दिवसांपासून बांधकामातून तयार होणार्या डेब्रिजची विल्हेवाट लावली जात आहे, तर वाशी सेक्टर 9 येथे मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले आहे. डेब्रिजच्या ढिगार्यांमुळे पावसाळ्यात पाणी तुंबून पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॅट कनेक्ट फाऊंडेशन संस्थेचे संचालक बी.एन.कुमार यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र लिहून पर्यावरणाचा र्हास करणार्या डेब्रिज माफियांवर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे आयुक्त बांगर यांच्या सूचनेनुसार संबंधित विभागाने खाडीकिनारे आणि पाणथळ क्षेत्रात टाकलेले डेब्रिज हटविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकणार्या विकासक, कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी हरितप्रेमींनी केली आहे.