वाहतूक कोंडी विरोधात ठाकरे गट आक्रमक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत हे मुंबईचे उपनगर म्हणून विकसित होत असताना कर्जत शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी बाहेरून व्यवसायासाठी येणाऱ्यांसाठी मोठी समस्या बनली आहे. सुट्टीच्या दिवशी कर्जत रेल्वे पूल आणि चारफाटा या भागातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी एका तासापेक्षा अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या कर्जत तालुक्यातील जनतेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुढे आला आहे. त्यांनी वाहतूक कोंडी बाबत आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

कर्जत येथे नवीन सब अर्बन स्थानक बनत आहे, त्यानंतर नेरळ शेलू येथून एक नवीन महामार्ग तयार होत आहे, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे कर्जत शहर भागातील रस्त्याचे जाळे महत्वाचे ठरणार आहे. कर्जत-पनवेल नवीन रेल्वे टर्मिनस सुरू झाले की चार फाटा येथील वाहतूक कोंडीचा स्फोट होणार हे निश्चित आहे. कारण सध्या चार फाटा हा कर्जतचा सर्वात मोठा बॉटलनेक होणार आहे. आता दर शनिवार आणि रविवारी या चार फाट्यावर प्रचंड वाहन कोंडी होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने उड्डाणपूल बांधण्याची गरज बनली आहे. त्यामुळे श्रीराम पूल येथून कर्जत चारफाटा असा चार दिशेने वाहने जाणारा उड्डाण पूल येथे आवश्यक आहे. तसेच नेरळ माथेरान, कर्जत शहर आणि मुरबाड बायपास, खोपोली अशा मार्गाने वाहतूक वळवली गेल्यास मोठा फायदा वाहनचालक यांना होऊ शकतो. त्याचबरोबर तात्पुरता उपाय म्हणून कर्ज सब अर्बन सुरू होण्याआधी चार फाटा सिग्नल यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित होण्याची गरज आहे. नो-पार्किंग झोन, आणि वन-वे नियोजन सक्तीचे करावे लागणार असून पण कायमस्वरूपी तोडगा म्हणून उड्डाणपूल बांधण्याची गरज पुढे आली आहे. तर रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन पुलाला तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता आहे. या सर्व मागण्या घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

Exit mobile version