लाडक्या बहिणींच्या खात्यात अनुदान जमा करा; तहसीलदारांना निवेदन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी लाडक्या बहिणींना 1 हजार 500 रुपयांवरून 2 हजार 100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीच्या घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी दिले होते. प्रत्यक्षात मात्र अनुदानात वाढ करण्यात आली नाही, असा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. तसेच, लाडकी बहिण योजनेचे अनुदान 2 हजार 100 रुपये खात्यात जमा करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अलिबाग महिला आघाडीने केली आहे. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना अंमलात आणली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये अनुदान देण्यात आले. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीमधील घटकपक्षांनी आपले सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे अनुदान 2 हजार 100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला भुलून महिलांनी महायुतीच्या बाजूने मतदान केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, निवडणूक संपून चार महिने उलटले तरी लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढविण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अलिबाग महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. तत्काळ लाडकी बहीण योजनेचे अनुदान 2 हजार 100 रुपये करुन ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. त्याबाबतचे निवेदन अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांना देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अलिबाग-मुरूड विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर, अलिबाग तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, युवतीसेना अलिबाग तालुका अधिकारी दर्शना वाकडे, अलिबाग उपतालुका संघटिका वंदना पाटील, चौल विभाग संघटिका शिल्पा ठाकूर, मापगाव विभाग संघटिका निवेदिता गावंड व मापगाव उपविभाग संघटिका तृप्ती जावकर उपस्थित होत्या.