| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगर परिषद हद्दीतील वाढत्या नागरी समस्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून शहरातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात समस्या तात्काळ न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
माजी नगरसेवक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.22) शिवसेना ठाकरे गटाच्या कर्जत शहरातील पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शहरातील विविध गंभीर समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. माजी नगरसेवक सावंत यांनी शहराच्या दैनंदिन व्यवस्थापनात होणाऱ्या त्रुटींबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळेच समस्या अधिक बळावत आहेत. शहरात मच्छर फवारणी नियमित न होणे, रस्त्यांवरील खड्डे, अनियमित पाणीपुरवठा, बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, भटक्या कुत्र्यांचा त्रास, अपूर्ण स्ट्रीट लाईट व्यवस्था, नाल्यांची साफसफाई न होणे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांबाबत अनेक वेळा निवेदन दिले गेले असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी टीका यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच, शहरातील नागरी सुविधा सुरळीत व्हाव्यात यासाठी ठाकरे गटाने उचललेले पाऊल महत्त्वाचे असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर जनआंदोलन अटळ असल्याचे संकेत दिले गेले आहेत.
नागरी समस्यांबाबत ठाकरे गट आक्रमक
