ठाकरे गटाची सडेतोड टीका
। मुंबई । प्रतिनिधी ।
भाजपाला डोक्यावर नेण्याचे औदार्य ज्या बाळासाहेबांनी दाखवले त्या बाळासाहेबांच्याच शिवसेनेवर घाव घालणार्यांच्या पायाशी शिवसेनेतलेच बेइमान बसलेले दिसतात तेव्हा शिवरायांशी बेइमानी करणार्या इतिहासातील अवलादीची आठवण येते, अशा कठोर शब्दात ठाकरे गटाने भाजपवर आणि राज्यातील एकूणच राजकारणावर सडेतोड टीका केली आहे.
ठाकरे म्हणतात की, अमित शहांसारखे लोक महाराष्ट्रात येतात. भाषणे करतात. आपल्या भाषणात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाइलाजाने घेतात, मात्र बाळासाहेबांनी महाराष्ट्र रक्षणासाठी निर्माण केलेली शिवसेनारूपी कवचकुंडले याच अमित शहांनी ‘मोडून’ ती मोड कुणा तोतया शिंदेच्या हाती सोपवली आहे. अमित शहांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी एकनाथ शिंदेसारखे ‘तोतये’ सदाशिवभाई निर्माण केले आहेत. शिवसेना फोडण्यासाठी बारभाई कारस्थाने करून महाराष्ट्र विकलांग, गलितगात्र केला, मात्र ही तात्पुरती स्थिती आहे. पानिपताच्या राखेतून महाराष्ट्र आणि मर्हाठा पुन्हा उठला व लढत राहिला. त्याचे शौर्य अटकेपार गेले हे तोतयांचे राज्य महाराष्ट्रात निर्माण करणार्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात शेतकरी मरत आहे. मराठी तरुण बेरोजगारीच्या खाईत होरपळत आहे. महिलांवर बलात्कार आणि खुनी हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्राचा उद्योग लुटून बाजूच्या गुजरातेत नेला जात आहे, असेही ठाकरे म्हणाले.