| रायगड | आविष्कार देसाई |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात मुस्लिम समाजाची उपस्थिती प्रकर्षाने दिसून आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. सभेमध्ये उपस्थित राहिल्याने त्यांची मतं मिळत नाहीत, असे सांगत खासदार तटकरे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत आगपाखड केली. मुस्लिम समाज आमच्याच सोबत असल्याचा दावादेखील त्यांनी केला. मात्र, ठाकरे यांना मुस्लिम समाजाने प्रतिसाद दिल्याने राजकीय पक्षांच्या तंबूत घबराट पसरली, हे नक्की आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात प्रचाराचा नारळ फोडला आहे. कोकण दौऱ्यात त्यांनी जंगी सभा घेत मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. कडवट हिंदुत्वाचा त्याग करून राष्ट्रीयत्वाकडे शिवसेनेची वाटचाल सुरू केल्याचे त्यांच्या भाषणातून दिसले. त्यामुळे धर्मांध राजकीय पक्षांमुळे मुस्लिम समाजामध्ये असुरक्षिततेची निर्माण झालेली भावना दूर करण्यात त्यांना यश आल्याचे सभेतील मुस्लिम समाजाच्या उपस्थितीमुळे अधोरेखित होते.
शिवसेनेची दोन शकलं झाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये मरगळ आली होती. काहीच दिवसांवर आता लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी उद्धव ठाकरे हे मातोश्रीबाहेर पडले आहेत. कोकणाने नेहमीच शिवसेनेला साथ दिलेली आहे. आता तर शिवसेनेला सर्वसामान्य कार्यककर्त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात कोकणातील शिव छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यातून केली आहे. त्यांनी पेण, अलिबाग, रोहा, पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव या सहा ठिकाणी त्यांनी दोन दिवस सभा घेतल्या. सर्वच सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे यानिमित्ताने दिसून आले. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्येदेखील त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. कोकणात बऱ्याच ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरीचा फटका बसला आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दिशा सापडत नसल्याचे ठाकरे यांनी हेरले होते. सर्वसामान्य जनतेच्या मनात शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सहानुभूतीची भावना आहे. अशा कालावधीत त्यांना साध घालणे क्रमप्राप्त होते आणि त्यामध्ये त्यांना यश आल्याचे दिसून येते. शिवसेनेला सोडून खासदार, आमदार, पदाधिकारी गेले आहेत. मात्र, मूळ शिवसैनिक हा ठाकरेंसोबतच असल्याचे कोकण दौऱ्यातील जनसंवाद कार्यक्रमामुळे स्पष्ट झाले.
देशातील मुस्लिम समाजाप्रमाणेच कोकणातील मुस्लिम समाजामध्येदेखील असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत मुस्लिम समाज कायम राहिला आहे. मात्र, काँग्रेसचे विशेष प्रयत्न अद्यापही दिसून येत नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा भाजपासोबत गेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज काहीसा नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाले. आता ठाकरे यांनी हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचा विश्वास विविध जनसंवाद दौऱ्यातून देण्याचा प्रयत्न केला. त्याला मुस्लिम समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांच्या सभेतील सहभागातून दिसून येते. रायगड जिल्ह्यातील मोर्बा, म्हसळा येथे मुस्लिम समाजाच्यावतीने ठाकरे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांनी ठाकरे यांना मराठी भाषेतील कुराणाची प्रत भेट म्हणून दिली, त्याचा खुल्या मनाने ठाकरे यांनी स्वीकार केला. मात्र, मुस्लिम समाजाच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. सभेमध्ये उपस्थित राहिल्याने त्यांची मतं मिळत नाहीत, असे सांगत खासदार तटकरे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत आगपाखड केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत मुस्लिम समाजामध्ये नक्कीच सहानुभूती आणि आपुलकीची भावना आहे. त्यांनी आपल्या कोकण दौऱ्यामध्ये हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचे सांगितले. राष्ट्रीयत्व म्हणजे त्यांच्यासाठी सर्वधर्माबाबत समभावाची भावना आहे. येथील काही राजकीय पक्षांनी स्वार्थी राजकारण करत भाजपासारख्या धर्मांध शक्तीबरोबर हातमिळवणी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही.
अमिर खानजादा, जिल्हाध्यक्ष,
दक्षिण रायगड राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
सत्तेच्या हव्यासापोटी धर्मनिरपेक्ष पक्षाने भाजपाशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे निश्चितच मुस्लिम समाजात नाराजी आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. त्याच विचारावर उद्धव ठाकरे जात आहेत. त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेशी जोडला जात आहे. हे जनसंवाद सभेत दिसून आले आहे. त्यामुळे कोणाला मिरच्या झोंबल्या असतील तर झोंबू देत. कारण, त्यांनीदेखील शरद पवार यांच्यासोबत गद्दारी केली आहे. त्यांना जनता धडा शिकवणारच आहे.
सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख,
शिवसेना (ठाकरे गट)