थळ येथील तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

लाच घेताना रंगेहात पकडले

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील थळ येथील तलाठी आणि कोतवाल यांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.6) लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईने लाच घेणाऱ्यांना दणका मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थळ येथील तलाठी कार्यालयात तक्रारदार यांनी जमीन वर्ग दोन वरून एक करण्यासाठी अर्ज केला होता. ही नोंद करण्यासाठी तलाठ्याने तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपयाची लाज मागितली होती. त्यामध्ये कोतवालचाही सहभाग असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले. तक्रारीनुसार, रायगडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. अखेर मंगळवारी थळ मधील तलाठी कार्यालयात तलाठी अमृत चौगुले याला 1 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तलाठ्यासह कोतवालला ताब्यात घेण्यात आले असून, दोघांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Exit mobile version