गणेशोत्सवासाठी तळा बाजारपेठ सजली

। तळा । वार्ताहर ।

लाडक्या बाप्पाचं आगमन यंदा लवकरच असल्याने गणेशोत्सवात लागणार्‍या विविध साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. गणेशोत्सवासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असल्याने रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित झालेले चाकरमानी आपल्या गावी परतू लागले आहेत. चाकरमानी चार दिवस आधीच गावी येऊन गावातील घराची साफसफाई करून घरामध्ये गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य भरून ठेवतात.

तळा हे तालुक्याचं ठिकाण असल्याने आजूबाजूला वसलेले खेड्यातील अनेक नागरिक खरेदीसाठी शहरात येत असतात.तसेच फळे, पालेभाज्या इतर जीवनावश्यक वस्तू माफक दरात मिळत असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.गणरायाच्या पूजेसाठी लागणारे धुप, कापुर, अगरबत्ती, गळ्यातील कंठीहार, सजावटीसाठी लागणारे कृत्रिम फुलांच्या माळा तसेच विविध साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. यावर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान महिलांच्या खात्यात जमा झाल्याने बाजारात खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे.

Exit mobile version