| तळा | वार्ताहर |
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही तळा बाजारपेठेत शुकशुकाट पसरलेला असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील दिवसेंदिवस वाढत्या स्थलांतरामुळे बाजारपेठेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. घटत्या लोकसंख्येमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायातही कमालीची घट आली आहे. एरव्ही चाल ढकल करून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना सणांमध्ये व्यवसायात तेजी येण्याची अपेक्षा असते. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी गावी येत असल्याने येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात विविध प्रकारचा माल भरपूर प्रमाणात भरून विक्रीसाठी ठेवला आहे. मात्र बाजारपेठेत ग्राहकांचा पत्ता नाही.
पूर्वी कुटुंबातील एक ते दोन सदस्य कामानिमित्त शहरात असायचे मात्र हल्ली कुटुंबच्या कुटुंब शहरात स्थलांतरित होत असल्याने बहुतांश नागरिक गणेशोत्सव देखील मुंबईलाच साजरे करतात. तसेच गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणारे बहुतांश चाकरमानी गणेशोत्सवासाठी लागणारा साहित्य शहरातूनच घेऊन येत असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. अशाच गणेशोत्सव तोंडावर आला असताना देखील बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने मालाची विक्री होणार तरी कशी अशी चिंता व्यापारी वर्गाला लागून राहिली आहे.