तळा तालुक्याला नागरी समस्यांनी ग्रासले

शहराचा विकास होणार कधी? नागरिकांचा प्रश्‍न
। तळा । वार्ताहर ।
कालानुरूप परिस्थितीनुसार तळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. बघता बघता नगरपंचायतीला पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला. मात्र शहर सुजलाम सुफलाम झाले असे काहीही घडलेले नाही. ग्रामपंचायत असताना शहरातील बहुतांश समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे समस्यांनी ग्रासलेल्या शहराचा विकास होणार तरी कधी असा प्रश्‍न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शहरातील मुख्य असलेल्या पाण्याच्या प्रश्‍नाच राजकीय पक्षांनी खेळ मांडला आहे. आधी मंजुरी पत्र मग बॅनर बाजी त्यानंतर श्रेयवाद व पुन्हा वर्क ऑर्डर निघाली नाही म्हणून एकमेकांवर खापर फोडण्याचे काम चालू आहे. तळेवासीयांनी असे घाणेरडे राजकारण याआधी कधीही पाहिले नसेल. शहरातील डम्पिंग ग्राऊंडची समस्या अद्यापही जैसे थे च आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून शहराची स्वच्छता करण्यात येते. मात्र गोळा केलेला कचरा हा तहसिल कार्यालयाजवळ असलेल्या धरणाजवळ टाकला जातो. केवल नावालाच स्पीकरवरून ओला व सुका कचरा वेगळा देण्यास सांगितला जातो. प्रत्यक्षात मात्र कचरा विघटनाची कोणतीही व्यवस्था नसल्याने एकत्रितरीत्या हा कचरा साठविला जात आहे. उन्हाळी हा कचरा जाळला जातो तर पावसाळी डम्पिंग ग्राउंडची अवस्था दयनीय झालेली पहायला मिळते.

या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते व जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.याच ठिकाणी अर्ध्या शहराला पाण्याचा पुरवठा करणारी बोरिंग असल्याने कालांतराने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यांसह उनाड गुरे, भटकी कुत्रे, मच्छिमार्केटचा प्रश्‍न, सुसज्ज भाजी मंडई, यांसारख्या अनेक समस्या एवढ्या वर्षानंतरही कायम आहेत. या समस्या सुटण्यासाठी शहराला कोणीतरी दत्तक घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

Exit mobile version