तळा ते इंदापूर शटल सेवा आवश्यक

। तळा । वार्ताहर ।
तळा ते इंदापूर सुरू असलेली शटल सेवा शनिवार पासून बंद करण्यात आली असून ही शटल सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. गेली कित्येक महिने सुरळीत सुरू असलेली तळा ते इंदापूर शटल सेवा अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तळा बसस्थानकातून सुरू असलेली 7.40 तळा ते इंदापूर, 8.45 तळा ते इंदापूर, 10.10 तळा ते इंदापूर, दुपारी 1 तळा ते इंदापूर, दुपारी 3 वाजता तळा ते इंदापूर या एसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळी 6.15 वाजता ची मुंबई गाडी सोडली तर इंदापूर ला जाण्यासाठी तीन तास कोणतीही एसटी नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यांसह तळा बसस्थानकातून सकाळी 6.30 वाजता श्रीवर्धनसाठी सुटणारी व श्रीवर्धन बसस्थानकातून सायंकाळी 6 वाजता सुटणारी एसटी देखील गेल्या लॉकडाऊन काळापासून बंद अवस्थेत आहे. तळा बसस्थानकात वस्तीची ही एकमेव गाडी असल्याने रात्री इंदापूर वरून येणार्‍या प्रवाशांसाठी ही एसटी अतिशय उपयुक्त व सोयीस्कर पडत होती. मात्र ती देखील बंद करण्यात आल्याने रात्री इंदापूर वरून येणार्‍या प्रवाशांना पर्याय नसल्याने खाजगी वाहनाने जास्तीचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे इंदापूर शटल सेवा व तळा बसस्थानकात वस्तीला येणारी श्रीवर्धन बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version