सागावनजीक रस्त्यालगत एसटी घसरली; चालक वाहकसह 23 प्रवासी सुखरूप
। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग- पेण रस्त्यावरील कार्लेखिंडउतारावरील सागावगावानजीक ठाणे -अलिबाग एसटीला अपघात घडला. अलिबाग कडून पेणच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एसटीला वाचविण्याच्या प्रयत्नात ठाणे -अलिबाग एसटीच्या चालकाचा वेगावरील ताबा सुटला आणि एसटी रस्त्यानजीक घसरली. यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अपघात घडलेल्या एसटीमध्ये चालक आणि वाहकासह 23 प्रवासी प्रवास करीत होते. घडलेल्या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. चाकरमानी गणेशाच्या स्वागतासाठी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाच्या दिशेने येत आहेत. रविवारी सकाळी ठाणे येथून अलिबागच्या दिशेने एसटी महामंडळाची बस निघाली. बस उरण डेपोची होती. ठाणे- अलिबाग एसटी कार्लेखिंड परिसर सुरक्षित उतरून अलिबागच्या दिशेने रवाना झाली होती. कार्लेखिंडीच्या अलिबागच्या दिशेला असणाऱ्या अवघड वळणावर ही एसटी आली. त्याचवेळी अलिबाग येथून पेणच्या दिशेने जाणारी एसटी महामंडळाची बस ठाणे- अलिबाग एसटीच्या समोर आली त्या एसटीला धडक बसू नये यासाठी ठाणे -अलिबाग एसटीच्या चालकाने प्रसंगावधान राखत एसटी बाजूने सुरक्षित नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यादरम्यान एसटी चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले. यामुळे एसटी रस्त्याच्या साईडपट्टीवरून घसरली. यावेळी एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. यावेळी एसटीत 23 प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रवाशांना स्थानिक आणि पोलीस यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले. घडलेल्या अपघाताबाबत एसटी चालकाला विचारले असता समोरून येणाऱ्या एसटीला वाचविण्याच्या प्रयत्नांत हा अपघात घडला असल्याचे सांगितले. या अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी वेळेत घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आहे.
