मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने कामकाज
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील महिला चंद्रावती वासुदेव आचार्य यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी आणि जाबजबाब घेण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालय नेरळ येथे आले होते. नेरळ येथील महिला आचार्य यांचा रस्ता बंद करून त्यांची अडवणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाने ठाणे जिल्हा न्यायालय आणि अप्पर जिल्हाधिकारी यांनी नेरळमध्ये न्यायालयाचे कामकाज पार पाडले.
नेरळ गावातील रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे चंद्रावती वासुदेव आचार्य यांनी आपल्या घराकडे जाणारा रस्ता बंद करणार्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात रिट दाखल केले आहे. त्या रीट पीटिशनमधील चौकशीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश काढताना ठाणे जिल्हा न्यायालयाचे सहा. न्यायाधीश तसेच अतिरिक्त सह न्यायाधीश आणि ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्थळ पाहणी करून जाबजबाब नोंदवावा, असे आदेश दिले होते. त्यासाठी सहा एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी विकास गजरे यांनी रिट दाखल करणार्या चंद्रवती आचार्य यांच्या घराचे जवळ सर्वांना स्थळ पाहणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पीटिशनमध्ये आठ लोकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यात महारष्ट्र शासनदेखील प्रतिवादी आहे. त्यानुसार रविवारी सकाळी ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश हे सकाळी नेरळ येथे पोहोचले.
आचार्य कुटुंब आणि राजेंद्र वाघेश्वर कुटुंबीय यांच्यात गेली 10 वर्षे जागेवरून वाद सुरू आहे. मात्र, रिट दाखल करताना चंद्रवती आचार्य यांनी आपल्या परमेश्वरी लॉजकडे जाणार्या रस्त्यात अडथळे आणणार्या अनेकांना प्रतिवादी केले आहे. त्या सर्वांना अप्पर जिल्हाधिकारी गजरे यांनी नोटीस काढल्या होत्या. सकाळी ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आणि अन्य हे नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. त्यावेळी न्यायाधीश यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी विकास गजरे, ठाणे तहसीलदार चौधर तसेच कर्जत नायब तहसीलदार सचिन राऊत, पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि ठाणे जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा लावाजमा सोबत होता. सकाळी स्टेशनजवळील राठोड आळी भागात स्थळ पाहणी केल्यानंतर न्यायाधीश यांनी रिट पीटिशन दाखल करणार्या आचार्य यांच्या घराची पाहणी केली. त्यानंतर सर्व नेरळ ग्रामपंचायत येथे पोहोचले. तेथे न्यायाधीश यांच्याकडून अर्जदार आणि सामनेवाले या सर्वांचे जबाब घेण्यास सुरुवात केली. हे जाबजबाब घेण्याचे काम सकाळी अकरापासून सायंकाळी पाचपर्यंत सुरू होते.
मात्र, नेरळ ग्रामपंचायत, ग्रामसभा,रायगड जिल्हाधिकारी इथपर्यंत लढली गेलेली केस आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली असून, त्यानिमित्ताने नेरळ येथे उच्च न्यायालयाच्या आदेशाने ठाणे जिल्हा न्यायाधीश नेरळमध्ये आल्याने चांद्रावती आणि वाघेश्वर केसबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.