| ठाणे | प्रतिनिधी |
कुमार विभागात ‘ड’ गटात अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात ठाणे ग्रामीण संघाने नाशिक शहर संघावर 31-29 असा निसटता विजय मिळवित आपल्या गटात विजयी सलामी दिली. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या चाललेल्या सामन्यात ठाण्याच्या दिव्येश पाटील याने चौफेर चढाया करीत हल्ला चढविला व आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हर्ष भोईर याने चांगल्या पकडी घेत नाशिकचे आक्रमण थोपविले. नाशिक शहरच्या ऋषी दावांगे याने शेवटपर्यंत प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला यश आले नाही. पराभवाला सामोरे जावे लागले. ज्ञानेश्वर शेळके याने चांगल्या पकडी घेतल्या.
‘क’ गटात झालेल्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने धुळे संघावर 41-24 अशी मात करीत आपल्या गटात विजय मिळविला. ‘ब’ गटात जालना संघाने अहमदनगर संघावर 37-28 अशी मात करीत विजय मिळविला. जालण्याच्या विरेंद्र मंडलिक, ओमराज उखरदे व सौरभ धामोडे यांनी जोरदार खेळ केला. अहमदनगरच्या विशाल ब्राम्हणे याने उत्कृष्ठ चढाया केल्या. संकेत खलाते याने चांगला प्रतिकार केला.
कुमारी विभागात ‘क’ गटात झालेल्या सामन्यात परभणी संघाने हिंगोली संघावर 60-15 अशी दणदणीत मात करीत आपल्या गटात विजय मिळविला. ‘ई’ गटात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर (पश्चिम) संघाने ठाणे ग्रामीण संघाचा 26-25 असा अवघ्या एक गुण फरकाने विजय मिळविला. ठाणे ग्रामीण संघाच्या सानिया गायकवाड हिने सुरेख खेळ केला. तर वेदिका ठाकरे हिने सुरेख पकडी घेतल्या.