ठाणे एसटी विभाग शिमगोत्सवासाठी सज्ज

| ठाणे | प्रतिनिधी |

गणेशोत्सवानंतर शिमगोत्सवासाठी चाकरमानी हे आपल्या गावी जातात. त्यामुळे नेहमीच या चाकरमान्यांना सुखरूप सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे विभाग दरवर्षीप्रमाणे यंदाही सज्ज झाले. या वेळी तब्बल 75 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले. 28 फेब्रुवारीपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार असून, कोकणातील विविध प्रमुख मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या होळीचा पारंपरिक शिमगोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या शिमगोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला कोकणी माणूस कोकणात जातो. विशेषतः होळीच्या काळात देवाची पालखी नाचवणे, ग्रामदैवतांची पूजा, पारंपरिक खेळ, फागोत्सव आणि सामाजिक एकोपा अनुभवण्यासाठी कोकणी माणूस आवर्जून गाव गाठतो. अशा चाकरमान्यांना नेण्यासाठी ठाणे एसटी सज्ज झाली आहे.

मार्च महिन्याच्या 2 तारखेला होळी, तर 3 ला धुळवड आहे. यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाही विशेष नियोजन केले आहे. ठाणे एसटी विभागाच्या विविध आगारांतून कोकणातील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील महाड या प्रमुख ठिकाणांसाठी नियमित बससेवेव्यतिरिक्त एकूण 75 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बससेवेच्या आगाऊ तिकीट बुकिंगची सुविधा संगणकीय (ऑनलाइन) आणि ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली असून, बुकिंगची प्रक्रिया 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत सुरू राहणार आहे. याशिवाय गटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ग्रुप बुकिंगची स्वतंत्र सोयही करण्यात आली आहे.

आगार बस संख्या
ठाणे खोपट- 21, विठ्ठलवाडी- 21, बोरिवली- 17, कल्याण - 17, भाईंदर- 3, एकूण 75
Exit mobile version