चार पर्यटक थोडक्यात बचावले
| माथेरान | वार्ताहर |
रविवार विकेंड सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी माथेरान थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची झुंबड दिसत आहे. चोहिकडे हिरवी वनराई आणि डोंगर दरीतून फेसाळणारे निखळ शुभ्र धबधब्याचे पाणी येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असताना आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाट चढत असताना भीषण अपघात घडला.
गुजरात राज्याची पासिंग असलेली महेंद्र कंपनीची थार या कारमध्ये चार प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, ते बालबाल बचावले असून, किरकोळ जखमी झालेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली होती. माथेरान घाटातील जुमापट्टी या रेल्वे स्थानकाच्या वरील पहिला क्रॉसिंग रेल्वे ट्रॅक वळणावर हा अपघात घडला. घाट उतरत असलेल्या स्कुटी चालक महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कारमधील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असणारी सुरक्षा लोखंडी रेलिंग तोडून थेट कार खड्ड्यात जाऊन अपघातग्रस्त झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. कार गुजरात पासिंग असून हे पर्यटक अहमदाबाद येथून आल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्या सोबत आणखी काही मित्र दुसऱ्या कारमध्ये होते. अपघातग्रस्त कार टॉय करून बाहेर काढण्यात आली. त्यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा दूर झाला.






