गार्डनमधील ‘ती’ शौचालये रद्द

प्रीतम म्हात्रेंच्या मागणीनंतर आयुक्तांचे निर्देश

| पनवेल | प्रतिनिधी |

नवीन पनवेल सेक्टर 3 येथील भूखंड क्रमांक 56 आणि 57 या गार्डन भूखंडावर नव्याने सुशोभिकरण होत आहे. ते होत असताना सदरच्या प्लॅनिंगमध्ये दोन्ही ठिकाणी शौचालयाची नव्याने उभारणी होत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचे शेकापचे युवा नेते तथा महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रेंनी आयुक्त देशमुख यांच्या निदर्शनास आणून देताच ती शौचालये रद्द करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

दरम्यान, गार्डनपासून 50 ते 100 मीटर अंतरावर दोन्ही बाजूवरील मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक शौचालय आहेत. तसेच त्या परिसरात राहणार्‍या आणि त्या परिसरात बाहेरून येणार्‍या व्यक्तींसाठी सद्यःस्थितीमध्ये सुरू असलेली दोन्ही शौचालय आहेत. असे असतानासुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असलेल्या गार्डनमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात आल्याने नागरिकांच्या पैशाचा व्यवस्थित वापर होत नाही, तसेच गार्डनमधील जागा शौचालयासाठी विनाकारण वापरली जात होती.

स्थानिक नागरिकांचा या नव्याने होत असलेल्या शौचालयाला विरोध आहे. ही तक्रार विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडे स्थानिक नागरिकांसोबत नवीन पनवेलचे शेकाप नेते प्रभाकर कांबळे यांनी केली. ही गोष्ट संबंधित विभागातील अधिकारी राजेश कर्डिले यांच्यासोबत प्रत्यक्षरित्या साईट विजीट करून नागरिकांसमवेत चर्चा करून प्रीतम म्हात्रे यांनी सदरचे शौचालय नागरिकांना नको असल्या कारणाने ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी उपस्थित अधिकार्‍यांनीसुद्धा नागरिकांसमोर शौचालय उभारण्यात येणार नाही या गोष्टीसाठी दुजोरा दिला. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रीतम म्हात्रे यांनी शौचालय त्वरित रद्द करण्यासाठी आपण निर्देश द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात आयुक्त देशमुख यांनी संबंधित विभागाला सदर शौचालय रद्द करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

Exit mobile version