पोलीस ठाण्यातील तो व्हिडीओ व्हायरल; एकाला अटक

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी उपस्थित नसल्याचा फायदा घेत अधिकार्‍याच्या खुर्चीवर बसून हातात पिस्तुल घेऊन हवेत फिरवत असल्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर प्रसारित करणार्‍या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे आहे. मोसिन शेख असे या आरोपीचे नाव आहे. याने त्याचे ट्विटर अकाऊंटवरुन एक इसम पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकार्‍यांच्या खुर्चीमध्ये बसुन, खुर्चीचे मागे असलेला महाराष्ट्र पोलीसांचा लोगो व स्वतःचा व्हिडीओ काढुन तो इन्स्टाग्रामवर प्रसारीत केला आहे. तसेच हातात पिस्टल धरून ते हवेत फिरवित असल्याचा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर प्रसारीत केला आहे.

आरोपीने कोणत्या पोलीस ठाण्यात व्हिडीयो काढला, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी तपास पथकामार्फत सदर बाबीचा शोध घेतला असता, सदर व्हिडीओमधील व्यक्ती ही डोंबिवलीमध्ये राहणारा सुरेंद्र पांडुरंग पाटील हा आहे. तसेच तो महाराष्ट्र नरबळी व अंधश्रध्दा निर्मुलन कायद्यामधील फिर्यादी असुन, सदर गुन्हयाचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे हे करीत आहेत.

श्रीकृष्ण गोरे यांनी सदर गुन्हयाचे तपासात आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन 19 लाख 96 हजार रुपये जप्त केले होते. सदरची रक्कम ही सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी यांची असल्याने, न्यायालयाचे आदेशानुसार ती रक्कम फिर्यादींना परत करण्याचे आदेश निर्गमित झाले होते. त्याप्रमाणे सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी हा त्याची रक्कम घेणेसाठी 25 ऑक्टो. मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी श्रीकृष्ण गोरे हे सुरेंद्र पाटील यांच्या रकमेसंबंधित कक्षातुन मुद्देमाल कक्षात गेले असता, त्यांचे कक्षात सुरेंद्र पाटील याने कोणीही अधिकारी व अंमलदार नसल्याचा फायदा घेवुन कक्षातील अधिकारी यांचे खुर्चीवर बसुन, खुर्चीचे मागे असलेला महाराष्ट्र पोलीसचा लोगोचा व स्वतःचा व्हिडीओ काढला.

तसेच त्याने पडघा, भिवंडी व अंजुरफाटा, भिवंडी या ठिकाणी त्याचे मित्रांचे घरी पार्टी करतान परवानाधारक पिस्तुल घेवुन हलगर्जीपणाने हातात फिरवुन त्याबाबतचा व्हिडीओ काढुन इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्याचे तपासात आढळुन आले. त्यामुळे सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी यास अटक करण्यात आली आहे. तसेच परवानाधारक शस्त्र आणि 5 जिवंत काडतुसे असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी यांची मर्सिडीज कार क्रमांक एम.एच.05 ई.टी. 7888 ची पंचासमक्ष तपासणी केली असता, त्यात एक बेकायदेशिर कुकरी मिळुन आली. त्याबाबत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्हयात एक कुकरी व मर्सिडीज कार असा 65 लाख 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या आरोपीविरुद्ध मानपाडा, कोळशेवाडी व महात्मा फुले पोलीस ठाणेत एकंदर 7 गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version