गौरी नाचविण्याची 100 वर्षापासूनची परंपरा आजही सुरुच

गौराईच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित
। पेण । वार्ताहर ।
गणपतीबरोबर येणारी गौरी म्हणजे सासुरवाशीणीला माहेरी जाण्याचा हक्काचा दिवस आणि गृहिणींसाठी पर्वणीच असते. महाराष्ट्रात गणेशोत्सवामध्ये गौरींचे आगमन समस्त महिला वर्गाचा आनंद द्विगुणित करते.गौरीपूजन हे गणपती उत्सवातील एक अविभाज्य अंग आहे.खासकरून कोकणात गौरींच्या आगमनाला अनन्य साधारण महत्व असते.कोकणात गणपती आगमन होताच स्त्रीया गौरीपूजनाच्या तयारीला लागतात. काही ठिकाणी गौरींचे उभे मुखवटे, पितळी मुखवटे तर काही घरांमध्ये शाडूपासून व प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मुर्ती व मुखवट्यांची जमवाजमव केली जाते.
पेण तालुक्यात सर्वत्र गौरीच्या पूजनाने वातावरण मंगलमय झाले आहे. नवीन सासुरवाशीणीला ववसा देण्यासाठी सुप खरेदीसाठी देखील स्त्रियांनी गर्दी केली होती.सकाळपासूनच गौरीला सजविणे ते गौरीच्या नैवेद्यासाठीच्या खाद्य पदार्थांची तयारी करण्यापर्यंत तसेच गौरीपूजनासाठी स्त्रीयांची लगबग सुरू होती. दुपारच्या सुमारास सर्वत्र गौरीची आरती होऊन नैवेद्य दाखविला जातो.त्यानंतर माहेरवाशिणीचा हा दिवस हक्काचा असल्याने त्यानिमित्ताने यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पेण तालुक्यातील खारेपाटातील गौरी नाचवण्याची 100 वर्ष जुनी परंपरा आजही जपली जात आहे. या बाबत वढाव येथील निवृत्त शिक्षक देविदास पाटील यांनी कृषिवलशी बोलताना सांगितले की, पेण तालुक्यात खारेपाटात गौरी नाचवण्याची जी परंपरा आहे ती इरत कोठेही पहायला मिळत नाही. या गौरी तीन वेळा नाचवल्या जातात. पहिल्या म्हणजे आगमनाच्या वेळी महिला डोक्यावर गौरी घेउन येतात त्या वेळी हात न धरता नाचवित घरा पर्यत आणतात. आज घरांना जिने आहेत, पूर्वी हात न धरता बांबूच्या शीडयांवरून महिला गौरी नाचवत मालभूई दाखवत.त्यानंतर विर्सजनाच्या वेळी घरातील महिला डोक्यावर गवर घेउन नाचवत नाचवत विसर्जन स्थळापर्यत घेउन जातात. अगदी 100 वर्षाच्या अगोदर पासून ही परंपरा पेण खारेपाटात जोपासली जात आहे.

Exit mobile version