| उरण | वार्ताहर |
न्हावे ग्रामपंचायतीवर शिवसेना-शेकाप आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास आघाडीने व्यक्त केला. सरपंचपदी शिवसेनेचे रवींद्र नारायण पाटील यांचा विजय निश्चित असल्याचेही आघाडीतर्फे सांगितले जात आहे.
न्हावा ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या 11 असून, थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. यापैकी शिवसेना 5 तर शेकाप 6 जागा लढवीत आहे. थेट सरपंचपदासाठी शिवसेनेचे रवींद्र नारायण पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर विरोधात भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे थेट सरपंचपदासाठी भाजपाचे विजेंद्र गणेश पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर सदस्यपदासाठी भाजपा 5, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेस 2 जागा लढवीत आहे. या ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाची सत्ता येण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. दोन्हीकडून आपलाच सरपंच निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. न्हावा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-शेकापची ताकद निश्चितच जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी शिवसेना-शेकाप आघाडीचे पारडे जड दिसत आहे.
थेट सरपंचपदासाठी शिवसेना-शेकाप आघाडीचे रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिल्याने मतदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच पक्षाच्या माध्यमातून रवींद्र पाटील यांनी अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत ते नक्कीच बाजी मारतील, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला.