बारा लाख 66 हजार 500 रुपयांची लाच घेताना केली कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते आतापर्यंत 18 लाचखोरांना दणका दिला आहे. बारा लाख 66 हजार 500 रुपयांची लाच घेतांना त्यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यात एका महसूल कर्मचाऱ्याला 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करताना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत महसूल आणि सिडको अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश अधिक आहे. लाच घेणे कायद्याने गुन्हा असतानादेखील अनेक शासकीय कार्यालयात काही लाचखोर अधिकारी व कर्मचारी लाच घेऊन काम करतात. लाच न दिल्यास ते काम करीत नाहीत, अशा तक्रारी वारंवार येत असतात. लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहेत. लाच घेऊ नये, म्हणून वारंवार या विभागामार्फत जनजागृती केली जाते. वेगवेगळ्या विभागात शिबीर घेतले जातात. तरीदेखील काही अधिकारी व कर्मचारी लाच घेतात. या लाचखोरांना दणका देण्याचे काम नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. या विभागाने अकरा ठिकाणी कारवाई केली आहे. त्यात 18 जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती या विभागाकडून प्राप्त झाली आहे.
पेण येथील पंचायत समितीमध्ये 11 एप्रिल रोजी छापा टाकण्यात आला. या छाप्यात एका आरोपीला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
पेण व पनवेल महावितरण कंपनीच्या एका कार्यालयात नऊ जूलै व 24 एप्रिलमध्ये छापा टाकला. त्यामध्ये पाच हजार रुपये व एक लाख 84 हजार रुपयांची लाच घेताना एकूण तिघांना पकडण्यात आले. महसूल विभागात तीन ठिकाणी वेगवेगळे छापे टाकले. या छाप्यात 15 हजार रुपये, दहा हजार रुपये, व पंधरा हजार रुपये असे एकूण 40 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली.
सिडको विभागात चार ठिकाणी छापे टाकले. नऊ जणांविरोधात कारवाई करीत त्यांना एकूण दहा लाख तीस हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. बेलापूर येथील न्याय विभागातील एका व्यक्तीला अडीच हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. एकूण 11 ठिकाणी छापे टाकून 18 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना 12 लाख 66 हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की, कोणीही लाच मागत असेल, तर तात्काळ नवी मुंंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 9920351064 येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी केले आहे.
लाचखोरांवर दृष्टीक्षेप
| विभाग | कारवाई संख्या | आरोपी संख्या |
| महसूल | 3 | 4 |
| पंचायत समिती पेण 1 | 1 | 1 |
| महावितरण कंपनी | 2 | 3 |
| बेलापूर न्यायालय, न्याय विभाग | 1 | 1 |
| सिडको | 4 | 9 |
| एकूण | 11 | 18 |
