रायगड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मापगाव येथील सशस्त्र दरोडाप्रकरणातील सात जणांना गजाआड करण्यात आले आहे. अलिबाग पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. या धडाकेबाज कारवाईने अवघ्या काही तासांमध्ये आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.
मापगाव येथील पाथरे यांच्या घरावर शनिवारी (दि. ३) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. घरातील काही मंडळींना डांबून ठेवण्याबरोबरच पेट्रोल अंगावर टाकून जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. घरातील दागिने व रोकडसह 18 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत फर्णे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. अलिबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तरित्या तपास सुरु केला. सीसीटीव्ही कॅमेरांसह वेगवेगळ्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध घेण्यात आला. अखेर त्यांना पकडण्यास रायगड पोलिसांना यश आले. सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच हा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले. दरोडेखोर भिवंडी या परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे.







