प्रशासनाने अखेर डाव साधला ?

अंगणवाडीचे कुंपण तोडले


| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आंबोली अंगणवाडीचे कुंपण बुधवारी घाईघाईने तोडण्यात आले. या संदर्भातील सुनावणी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर गुरुवारी होणार होती. त्या आधीच प्रशासनाने कुंपण तोडून टाकल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत आंबोली यांच्या मालकीच्या गावठाण जागेमध्ये अंगणवाडी बांधण्यात आली आहे. मुलांना खेळण्यासाठी गट नं. 597 मधून तुकाराम पाटील यांनी देणगी स्वरुपात जागा दिली होती. त्या जागेत ग्रामपंचायतीने तारेचे कुंपण केले. मात्र अलिबाकडे ती जागा पुर्वापार वहिवाटीची असल्याची तक्रार जहाँगिर यांनी मुरूडच्या तहसील कार्यालयात केल्याने वादाला प्रारंभ झाला.वहिवाटीची जागा असल्याने मामलेदार ॲक्टनुसार तोडण्याचा अधिकार प्रशासनाला असल्याचा दावा मुरूडच्या तहसीलदारांनी केला. याला ग्रामस्थांनी विरोध केला. दहा दिवसापुर्वी कुंपण तोडण्याची तयारीदेखील तहसीलदारांनी केली होती. परंतु ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्याने ही कारवाई थांबविण्यात आली.

अंगणवाडीतील मुलांच्या सुरक्षेसाठी संतोष मोकल यांच्यासह ग्रामस्थांनी अलिबागच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडेे धाव घेतली. तहसीलदार यांनी कुंपण तोडण्याचे दिलेले आदेश स्थगित करावे अशी मागणी केली. परंतु अलिबागच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तारीख पुढे ढकलत हे प्रकरण लांबणीवर नेले. 19 ऑक्टोबरला म्हणजे गुरुवारी यावर सुनावणी होणार होती. परंतु त्यापुर्वीच 18 ऑक्टोबरला पोलीसांच्या मदतीने हे कुंपण तोडण्यात आले. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मुरूडच्या तहसीलदारांच्या या कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याविरोधात तीव्र लढा पुकारला जाणार असल्याचे ही ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला होऊ शकला नाही.

कुंपण तोडण्याचे आदेश मी दिले नाहीत. त्यासाठी प्राधिकृत मंडळ अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आदेश दिले असणार, त्यानुसार कारवाई झाली असावी. कारवाई केल्याची माहिती घेतो. निवडणुकीच्या कामात असल्याने मी त्याठिकाणी गेलो नाही.

रोहन शिंदे – तहसीलदार मुरूड

अखेर लोकांना डावलून तहसीलदारांनी मनमानी कारभार करीत सर्कल राठोड आणि तलाठी विरकुड यांनी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणावरून जागा विक्रीसाठी रस्ता मोकळा करून दिला. एका बाजूला लोक ,लहान मुलांना खेळण्यासाठी जागेचे दानधर्म करतात. शासकीय यंत्रणा आपल्या पदाचा वापर करून धनदांडग्यांना तीच जागा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात यशस्वी होतात. हे या यंत्रणेने आज दाखून दिले आहे.

संतोष मोकल – ग्रामस्थ


Exit mobile version