दुर्घटना टाळण्यासाठी गाव पातळीवर प्लॅनिंग; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न
। रायगड । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात पावसाला बर्यापैकी सुरुवात झाली आहे. निसर्गप्रेमींसह पर्यटकांना गड-किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे आता खुणावू लागले आहेत. पुढील कालावधीत पाऊस सक्रीय झाल्यानंतर वर्षासहलींना सुरुवात होणार आहे. या कालावधीत अतिउत्साही पर्यटकांकडून अशा ठिकाणी हुल्लडबाजी केली जाते. काही वेळेला जीव गमावण्याच्या घटना घडल्या आहेत. यासाठी आता जिल्हा प्रशासन सर्तक झाले आहे. यासाठी त्यांनी गावपातळीपासून प्लॅनिंग करण्यात येत असून त्यांची करडी नजर राहणार आहे.
जिल्ह्यातील गड-किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणार्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय करणे गरजेचे आहे. तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकार्यांनी यासाठी गावपातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते. मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीद्वारे गावाच्या परिसर हद्दीतील पर्यटनस्थळ, तलाव, धबधबे, समुद्रकिनारे अशा जागांवर जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकार्यांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विविध माध्यमातून सतर्क करावे असे सुचित केले.
यावेळी पोलीस अधीक्षक घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बस्टेवाड यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था, काशीद समुद्रकिनारा येथे पर्यटक सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारणे, विविध धबधबे गड-किल्ले आदीं ठिकाणी संबंधित विभागांच्यावतीने उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रूपाली पाटील , कार्यकारी अभियंता महेश नामदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी बैठकीत सहभागी होत विविध माहिती दिली.
या ठिकाणी राहणार प्रशासनाची नजर मान्सून पर्यटनाच्या अनुषंगाने विविध तलाव, धबधब्याच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात पर्यटक येत असतात. या व मागील वर्षी काही ठिकाणी अपघात होवून पर्यटकांच्या मृत्यु होण्याच्या दुर्घटना घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रबळगडाच्या धर्तीवर इरशाळगड, पेब किल्ला, माणिक गड (रसायनी), कोथळी गड (पेठ गड), सागरगड व इतर पर्यटकांच्या गर्दी होणार्या वन विभागाच्या हद्दीमधील गड-किल्ल्यांवर स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देणे, पर्यटकांना स्थानिक गार्डडसोबत नेणे बंधनकारक करणे, पर्यटकांना गड-किल्ले, धबधबा, धरणे, पाणी प्रकल्प, समुद्र किनारी अन्य धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत चर्चा करून सूचना देण्यात आल्या.