राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाड येथील रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेसह जिल्हा सामन्य रुग्णालयामार्फत रुग्णवाहिकांसह डॉक्टर, कर्मचारी व औषध पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. अशोक कटोर यांनी दिली.

रायगडावर राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासन गेल्या महिन्याभरापासून प्रचंड मेहनत घेत आहे. वेगवेगळी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात सध्या तापमानात चढ-उतार सुरु आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची भीती अधिक निर्माण झाली आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्ण यंत्रणेमार्फत उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

एक ते सहा जून या कालावधीत विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामध्ये जिल्हा आरोग्य विभागामार्फत 102 क्रमांकाच्या 10 व जिल्हा रुग्णालयामार्फत 10, तसेच 108 क्रमाकांच्या आठ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट व बेसिक लाईफ सपोर्टची सुविधांचा समावेश असणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून नवी मुंबई व पनवेल महानगर पालिकांकडून आठ रुग्णवाहिकांची मागणी केली आहे. या रुग्णवाहिकांमध्ये तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य सेवक आदी कर्मचारी असणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत एकूण 17 टीम असणार आहेत. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी विभागाच्या 11 व जिल्हा सामान्य रुग्णालयामधील 6 टीमचा समावेश असणार आहे. प्रत्येक टीमध्ये तीन ते चार कर्मचारी असणार आहेत. तसेच महाड, पोलादपूर, माणगाव व रोहा येथील खासगी डॉक्टरांचीदेखील या कालावधीत मदत घेतली जाणार आहे. रुग्णवाहिका, कर्मचाऱ्यांसह मुबलक प्रमाणात औषध पुरवठादेखील करण्यात येणार आहे. सुमारे पाच लाख नागरिकांना त्याचा फायदा होईल, अशा पद्धतीने औषधांचे नियोजन केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले असल्याची माहिती डॉ. अशोक कटोर यांनी दिली.

दर दिवशी शंभर एसटी बसेस
या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यातून दर दिवशी शंभर एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरु आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना गडावर वेळेवर पोहोचता यावे यासाठी नियोजन करण्यात आल्याचे एसटी महामंडळ, रायगड विभागाचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी सांगितले.

Exit mobile version