रेवंदडा ग्रामपंचायतीचा निष्क्रिय कारभार

हरेश्वर मैदानावर सांडपाणी, अतिक्रमणाचा विळखा

| रेवंदडा | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायतीच्या कारभाराचा बोजवारा उडाल्याचे चित्र हरेश्वर सार्वजनिक मैदानाच्या विदारक अवस्थेमुळे समोर आले आहे. ‌‘शिंदे गटाची’ सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीलाच त्याच गटाचे ॲड. रोहित भोईर यांनी घरचा आहेर देत प्रशासनाच्या मनमानी कारभारावर जोरदार बोट ठेवले आहे.

मारुती आळीलगत असलेल्या हरेश्वर मैदानावर साईराज अपार्टमेंट या अनधिकृत इमारतीतून थेट सांडपाणी सोडले जात असल्याने मैदान अक्षरशः घाणीच्या विळख्यात सापडले आहे. एकेकाळी खेळाडू आणि मुलांनी गजबजलेले हे मैदान आज दुर्गंधी, कचरा आणि अतिक्रमणामुळे ओस पडण्याच्या मार्गावर आहे. ॲड. भोईर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. मात्र, स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे हरेश्वर मैदानाचा ऱ्हास वेगाने सुरू असून, “नोटीस देतो” यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटातीलच नेत्याने प्रशासनावर बोट ठेवल्याने ग्रामपंचायतीतील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे मैदान वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. अन्यथा सात दिवसांत तीव्र आंदोलन छेडले जाईल. विकासाच्या नावाखाली घाण आणि अतिक्रमण चालू देणार नाही.

ॲड. रोहित भोईर,
तक्रारदार

साईराज अपार्टमेंटला याआधी नोटीस देण्यात आली होती. याठिकाणी सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या तक्रारीनुसार पुन्हा नोटीस देण्यात येईल.

सुदेश राऊत,
ग्रामविकास अधिकारी
Exit mobile version