| चिरनेर | प्रतिनिधी |
मागील वर्षभरापासून सीबीडी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आंदोलन सुरू आहे. त्या वर्षपूर्ती निमित्ताने मंगळवारी (दि.28) जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी भूमीपुत्रांच्या साडेबारा टक्के वाटपाचा प्रत्यक्षात निर्णय व इतर मागण्यांची दखल सिडको प्रशासन घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे सिडको विरोधातील हा लढा तीव्र होण्याची शक्यता आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने दि.28 एप्रिल 2025 पासून बेमुदत धरणे सुरु करण्यात आले आहे. 2007 पासून इरादा पत्र आणि लॉटरी काढूनही आजपर्यंत भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही. या सभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व कामगार नेते जेएनपीएचे माजी विश्वस्त भूषण पाटील, जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, किसान सभा नेते संजय ठाकूर,किरण केणी आदींची भाषणे झाली. तर, आज पर्यंत 500 पेक्षा अधिक प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्केचे विकसित भूखंडाचा ताबा मिळालेला नाही. उरणच्या द्रोणागिरी नोडमधील अनेक सेक्टर मधील भूखंड विकसित करण्यात आलेले नाहीत. असे असतांना सिडको कडून 6 मार्च 1990 ला मंजूर झालेली योजना आज पर्यंत पूर्ण झालेली नाही. परंतु, सिडकोच्यावतीने ही योजना अंतिम टप्प्यात असल्याचे जाहीर केले आहे. ही भूमीपुत्रांची फसवणूक आहे, असे मत या जाहीर सभेत मांडण्यात आली आहे.
आंदोलन सुरूच राहणारः रामचंद्र म्हात्रे
