इंडिया आघाडीच्या प्रचारसभांना मतदारांचा प्रतिसाद
। रायगड । खास प्रतिनिधी ।
इंडिया आघाडीतील नेते हे थेट मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम समाजातील प्रश्नांना थेट हात घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारसभांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. विरोधकातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनादेखील जनतेशी निगडीत असणारे मुद्दे पटत असल्याचे दिसून येते. याच कारणांनी आता विरोधकांच्या प्रचारातील हवा निघून गेली नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आल्याने रायगडचे राजकीय रणांगण अजून तापणार आहे.
पारा चाळीशी पार झाला असतानाच दुसरीकडे रायगड लोकसभा मतदार संघामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीने तापमान वाढवले आहे. प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उन्हाची कोणतीच तमा राहीलेली नाही. इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना निवडणुकीत जिंकवण्यासाठी त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कमालीचे तापमान वाढले आहे. वैशाख वणव्यात सूर्याच्या प्रकोपाचा सामना रायगडकरांना करावा लागत आहे. याच कालावधीत रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा धडधडत आहे.
इंडिया आघाडीचे शिवसनेचे उमेदवार अनंत गीते आहेत. गीते हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शरद पवार, उध्दव ठाकरे, शेकापचे प्रमुख जयंत पाटील, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुषमा अंधारे, चित्रलेखा पाटील, पंडित पाटील, आस्वाद पाटील, यांच्यासह अन्य प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे गीतेंच्या प्रचारासाठी जाहीरसभा, प्रचार रॅली, बाईक रॅली, कॉनर्रसभा मतदारांच्या भेटी घेत आहेत. सध्या उन्हाचा पारा हा चाळीशी पार झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. गीतेंच्या प्रचारासाठी अशा तळपत्या उन्हाची पर्वा न करता सर्वचजण मैदानात उतरले आहेत. विविध सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गीतेंच्या सभेला देखील मतदारांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रचारासाठी कार्यकर्ता हा स्वयंस्फूर्तीने मैदानात उतरत आहे. त्यामुळे उमेदवारामध्ये देखील बळ आले आहे. इंडिया आघाडी देशासाठी किती हिताची आहे. हे सांगण्यावर प्रमुख वक्ते भर देताना दिसत आहेत. परंतु,विरोधक मात्र त्याला टीका समजत आहे. मराठा, दलित, ओबीसी आणि मुस्लिम समाजाला भेडसावणारे प्रश्न मांडण्यात येत असल्याने विरोधातील कार्यकर्ते देखील खासगीमध्ये इंडिया आघाडीच्या प्रचारातील मुद्यांना दाद देत असल्याचे मतदारसंघात दिसून येते. याच कारणामुळे आता विरोधकांच्या प्रचारातील हवा निघाली असल्याचे बोलले जाते. प्रचार आता आपल्या हातातून निसटत असल्याचे दिसत असल्याने विरोधकांनी आता इंडिया आघाडीच्या नेत्यांवर बेछूट आरोप करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मतदार अतिशय सुज्ञ असल्याने त्यांनादेखील आता खरे काय आहे, ते उमगले असल्याने येत्या (दि.7) मे रोजी मतपेटीतून धडा शिकवण्याची त्यांनी तयारी केली आहे.