बाळसईत रंगला हरिनामाचा गजर

| सुकेळी | वार्ताहर |

रोहा तालुक्यामध्ये नावलौकिक असलेल्या नागोठणे जवळील बाळसई येथे दि.13 ते 16 जानेवारी या चार दिवसांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मंगळवार (दि.16) नाना शिरसे (तामसोली) यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर श्रींच्या पालखी मिरवणूकीला सुरुवात झाली. यावेळी संपूर्ण बाळसई गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

टाळ-मृंदुगाच्या तसेच ज्ञानोबा माऊलींच्या गजरात गावातील सर्व महिला मंडळ, तरुण मंडळ, अबालवृद्ध मोठ्या उत्साहाने पालखी सोहळ्यात नाचण्यात दंग झाले होते. या सोहळ्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे येथे कामाच्या निमित्ताने राहणारे चाकरमानी तसेच माहेरवाशिणी चार दिवस या अखंड हरिनाम सोहळ्यासाठी दरवर्षी आवर्जून येत असतात. त्याचप्रमाणे गावातील सर्व महिलांनी आपापल्या घरासमोरील अंगणात आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. या पालखी सोहळ्यात सर्व भाविक हरिनामाच्या गजरात दंग होऊन गेले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ बाळसई या सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली.

Exit mobile version