। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
उन्हाळ्याचे आगमन होताच रानातील रानमेवा बाजारात दाखल झाला आहे. त्यामध्ये करवंदे, कैरी, अंजीर, काजू, चिंच इत्यादी फळांचा समावेश आहे. हा रानमेवा मोहपाडा, खोपोली, चौक या बाजारात दाखल झाला आहे. तसेच, या रानमेव्यामुळे आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. त्याचप्रमाणे हिरवी गार करवंदे खवय्यांना भुरळ पाडत असून त्याचा ठेचा करून स्वयंपाकासाठी वापरत असल्याचे महिला वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा निर्माण होण्यासाठी फलाहार केला जातो. बाजारपेठेमध्ये आंबा, द्राक्षे, फणस, चिक्कू यासारख्या फळांचा बरोबरच करवंद, काजुफळ, तोरणे यासारख्या रानमेव्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. असह्य करणार्या उन्हामध्ये अगदी पटकन तोंडात टाकता येणार्या आणि खायला रुचकर असणार्या या रानमेव्यांना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाचीच मागणी असते. शरीराला थंडावा देणारा आणि औषधी गुणधर्म असणारा रानमेवा अगदी आवडीने खाताना दिसतात.
रणरणत्या उन्हात रानमेव्याची भुरळ
