| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद शाळा तिवरे येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. सालाबादप्रमाणे यंदाही तिवरे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. माया मल्होत्रा उपस्थित होत्या.
2023 पासून शाळेतील दोन्ही शिक्षक श्रावणी मोरे व रविंद्र आंधळे यांनी या अनोख्या कार्यक्रमाची सुरुवात केली. गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळ, पालक यांनी सहकार्य करून याही वर्षी हा कार्यक्रम यशस्वी केला. शाळेने वेळोवेळी विविध उपक्रमामध्ये भाग घेऊन तिवरेचे नाव नावारूपास आणले आहे. अशी भावना उपस्थित मान्यवर मनोहरनाना देशमुख यांनी व्यक्त केली. यावर्षी परसबाग स्पर्धेमध्ये शाळेने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला म्हणून शाळा व्यवस्थापन समिती यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, शाळेच्या विकासासाठी कायम मदतीचा हात पुढे करणाऱ्या डॉ. माया मल्होत्रा यांचा सन्मान मुख्याध्यापक श्रावणी मोरे यांनी केला. शाळेतील शिक्षक रविंद्र आंधळे यांची व्यक्ती अभ्यास या स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल डॉ. माया मल्होत्रा यांनी आंधळे यांचा सन्मान केला. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील मान्यवर व्यक्ती, ग्रामस्थ, महिला, तरुण, आदर्श केंद्रप्रमुख अनिल राणे, माजी केंद्रप्रमुख सुरेश उमटे आदी मान्यवर उपस्थित होते.






