बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

| पुणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणार्‍या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (दि.27) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत, असे आव्हान राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी नियमित शुल्कासह (दि.27) मे ते (दि.7) जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. त्यानंतर (दि.8) ते (दि.12) जून दरम्यान विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी (दि.31) मे ते (दि.15) जून पर्यंतचा कालावधी दिला आहे. तर, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या (दि.18) जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे द्यायच्या आहेत.

पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येणार आहे. तसेच, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार फेब्रुवारी-मार्च 2024 मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी शुल्क मंडळाने निश्‍चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे ओक यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version