मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी, 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.
या पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच यावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असल्याने यावेळी विद्यार्थ्यांना माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबर, ते 8 ऑक्टोबर 2021 आणि बारावीची पुरवणी परीक्षा 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
या परीक्षेत कोणत्याही विशिष्ट विषयात विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन घेता येईल. यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेस्थळावर स्वतः किंवा शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.