परिस्थितीनुसार निर्णय घेणार -जिल्हाधिकारी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
हॉटेल, रेस्टॉरंट संदर्भात राज्यात कोरोनाचे निर्बर्ंध सरकारने शिथिल केले असले तरी रायगडातील निर्बंध तातडीने शिथिल होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाची एकूण स्थिती, रुग्णसंख्या, झालेले लसीकरण यांचा आढावा घेऊनच आणि संबंधीतांकडून तशी मागणी आल्यानंतरच निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कृषीवलशी बोलताना स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने सोमवारी मुंबईसह अन्य महानगरांमधील हॉटेल्स, रेस्टॉरंटसह अन्य व्यावसायिक दुकाने रात्री 11 पर्यंत सुरु ठेवण्याची अनुमती दिली आहे. मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत तेथील परिस्थिती पाहूनच स्थानिक प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, असेही सुचित केले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीवलने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा चढउतार सुरु असल्याचे सुचित केले. मुंबईतील हॉटेल संघटनांनी केलेल्या मागणीनंतर परवानगी प्रशासनाने दिली आहे. रायगडातील एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भात विचार करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, सर्व उपहार गृह दुकाने 11 पर्यत कार्यपद्धतीचा निर्णय देण्यात आला असला तरी जिल्हा प्रशासनाने त्यावर अजून विचार केला नाही, लवकरच यावर बैठक घेऊन ठरवण्यात येईल. जिल्ह्यात कोरोनाच्या किती केसेस आहेत, कशा वाढल्यात, काय होतंय, लसीकरणाचे प्रमाण किती आहे? आपण करायला पाहिजे की नाही, किती हॉटेल आहेत आपल्याकडे या सर्व गोष्टीचा अभ्यास करुन कितीजणांची मागणी आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. मुंबईच्या आहार संघटनेची मागणी होती. त्यानुसार तिकडे अमंलबजावणी करण्यात आली आहे. मात्र अशी आपल्याकडे कोणीही मागणी केलेली नसल्याचेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.